वाशिम

Washim Accident : लग्नावरून परतताना काळाचा घाला; मेहकर-मालेगाव महामार्गावर भीषण अपघातात तिवळी येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : मेहकर तालुक्यातील नागापूर येथील लग्नसमारंभ आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या दोन मित्रांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द शिवारात बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनाचा अत्यंत भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीवरील एका मित्राचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राधेश्याम वामन इंगळे (वय ४२, मृतक) आणि संतोष शिंदे (वय ४०, गंभीर जखमी) अशी या दुर्दैवी मित्रांची नावे असून, ते मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी आहेत.

विवाह सोहळ्याचा आनंद घेऊन हे दोन्ही मित्र दुचाकीने आपल्या तिवळी गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी पिंपरी सरहद्द शिवारात आली असता, समोरून भरधाव येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, राधेश्याम इंगळे यांचा जागीच करुण अंत झाला. अपघाताचा हा थरार घडल्यानंतर पिकअप चालक मात्र गाडीसह घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

लग्नाच्या वऱ्हाडातून परतणाऱ्या या मित्रांवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे काही क्षणांतच आनंदाचे रूपांतर शोकाकुळ वातावरणात झाले. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे नागरिकांचा तीव्र संताप

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि गंभीर जखमी संतोष शिंदे यांच्या उपचारासाठी '१०८' रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, अपघात होऊन अर्धा ते पाऊण तास उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलीस फरार पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT