वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन भागात इरिगेशन कॉलनीमध्ये जबरी चोरी झाल्याची घटना आज दि. 6 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. इरिगेशन कॉलनीत राहणारे इंजि. सिताराम सखाराम वाशिमकर यांच्या घरात ही चोरी झाली असून चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या घरातील सदस्य बाहेरगावी असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
कपाटातील नगदी ७ लाख रुपये, व ३९ तोळे सोन्याचे दागिने आणि १५ तोळे चांदीचे दागिने असा एकूण ३७ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. असून घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर भर दिवसा चोरी झाल्याने सिव्हिल लाईन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडीच्या या प्रकाराने पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे, पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. या प्रकरणात सविस्तर तपास सुरू असून, पुढील तपासात चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथक कामाला लागली आहेत.