Swabhimani Shetkari Sanghatana agitation
वाशिम: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आज (दि.१०) वाशिम जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील पवनचक्की टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. शासनाने नुकतेच राज्यातील 253 तालुक्यांसाठी अतिवृष्टीचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले असले तरी, वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर या सर्वाधिक बाधित तालुक्यांना या पॅकेजमधून वगळण्यात आले आहे.
यामुळे संतप्त इंगोले यांनी “या तीन तालुक्यांचा पॅकेजमध्ये समावेश होईपर्यंत खाली उतरणार नाही” अशी भूमिका घेत टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जून ते सप्टेंबर या कालावधीत खरीप पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे दीड तास सुरू असलेल्या या थरारक आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समुपदेशनाचे प्रयत्न सुरू केले. अखेर प्रशासनाने रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यांचा अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर इंगोले खाली उतरले.
यानंतर अग्निशमन दलाच्या क्रेनच्या साहाय्याने त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.