वाशिम : वाशिम जिल्ह्यातील राजगाव ओव्हर ब्रिजखाली एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघेजण ठार झाले. ही घटना वाशिमहून हिंगोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने भरधाव वेगात धावताना घडली. दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने दुचाकी ५० फूट फरफटत नेली, ज्यामुळे परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त करत अकोला-हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको केला.
अपघातात ठार झालेल्यांमध्ये एका महिलेसह एका पुरुषाचा समावेश असून, ते वाशिम तालुक्यातील उकळी पेन गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या संतापामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना शांत केले व वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.