Thackeray Shiv Sena Samruddhi Expressway Rasta Roko
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.३०) आ. नितीन देशमुख यांच्या नेतृवात समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी गुरूवारी (दि.२९) सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असलेल्या सुमारे १५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाशीम पोलिस दलाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असल्याने येथे रास्ता रोको केल्यास वाहतुकीत अडथळे निर्माण होण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच समृद्धी महामार्ग परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी, ही आंदोलनामागील प्रमुख मागणी आहे. खरीप हंगामातील नुकसानीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.