वाशीम : रिसोड पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धाडसी कारवाईत धारदार तलवार बाळगणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार, कटर, मोबाईल व दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
१८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजताच्या दरम्यान पोलिस स्टेशन रिसोडच्या डी.बी. पथकाला वाशीम नाका परिसरातील मुंदडा कॉम्प्लेक्स येथे तीन इसम अंधारात धारदार शस्त्रे घेऊन संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक रमेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सापळा रचताच तिन्ही संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून एका इसमाला ताब्यात घेतले, तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पकडलेल्या इसमाने आपले नाव शामराव शिवाजी काळे (वय २४, रा. साकळा प्लॉट, परभणी) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी तलवार, स्टील कटर, विवो कंपनीचा मोबाईल व पल्सर एनएस-१२५ दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला. तसेच घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयितांचा एक फायबर लाईटर पिस्तूल व ओप्पो कंपनीचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला.
चौकशीदरम्यान पकडलेल्या आरोपीने आपल्या साथीदारांची नावे अनिल उत्तम काळे (रा. परभणी) व रमेश किशन काळे (रा. निजामपूर, रिसोड) अशी असल्याचे सांगितले. मात्र ते तिघेही त्या ठिकाणी का थांबले होते याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी शामराव काळे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम व आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल खाटमोडे-पाटील (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.