वाशीम : बीड व परभणी प्रकरणी आज वाशीममध्ये भव्य सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, सदर मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू व इतर राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.
बीड येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्त्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी यासाठी आज वाशीम येथे सर्व पक्षीय-सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था, आणि संवेदनशील नागरिकांच्यावतीने महामूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि इतर राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाशीम छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन पाटणी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बीड हत्याकांडातील ७ आरोपीवर मोक्का लावण्यात आला मात्र घटनेतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत आणि कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही न्याय मागत राहणार अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.