Ad. Prakash Ambedkar File Photo
वाशिम

Prakash Ambedkar : फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले! ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट; खरीप पिकांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यात सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : महाराष्ट्रा मध्ये सर्वच जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पाण्याची टंचाई आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची कमी झालेली शक्यता यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असताना फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली.

वाशिम येथे दि. २६ आक्टोम्बर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्या फडणवीस सरकारला घेण्याची सवय आहे, ते सरकार शेतकऱ्यांना पाच हजार रुपयेही देऊ शकत नाही,” अशा शब्दांत ॲड. आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीचा आणि दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

दुष्काळाच्या सावटाखाली बळीराजा हवालदिल!

वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप पिकांना बसला असून, अनेक शेतकऱ्यांसमोर उत्पादनात घट होण्याचे संकट उभे आहे. पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीवर केलेला खर्च वसूल होईल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि बँकांच्या कर्जाची परतफेड अवलंबून असते. मात्र, पिकांचे नुकसान आणि उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. पुढील हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

सरकारच्या मदतीच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांवर समाधान मानता येणार नाही. नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीकविमा दाव्यांचा निपटारा आणि आवश्यक त्या ठिकाणी पाणीटंचाईवर उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना मदत देताना प्रत्यक्ष नुकसान, पात्रता आणि शासनाच्या निकषांनुसार निर्णय घेऊन मदतीचे वितरण वेळेत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाच हजारांच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विधानातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा पुढे आला. सरकारच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर टीका करताना त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार कधी, हा या निमित्ताने उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठोस निर्णय घ्यावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत द्यावी आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात जोर धरत आहे. दुष्काळाचे सावट, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकट अशा तिहेरी कोंडीत सापडलेल्या बळीराजाला आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या या आर्त हाकेला किती लवकर प्रतिसाद देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT