मृत राजू कांबळे, आरोपी यश ठाकूर  Pudhari
वाशिम

Washim Crime | समाजविघातक कृत्यांचा रक्तरंजित अंत; सराईत गुन्हेगार राजू कांबळेचा भररस्त्यात खून

Washim Murder Case | वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात दीर्घकाळापासून भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Washim Raju Kamble Murder

वाशिम : वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात दीर्घकाळापासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणाचा रविवारी रात्री भीषण शेवट झाला. सराईत गुन्हेगार म्हणून ओळख असलेला राजू तुळशीराम कांबळे (वय ३९) याची जुन्या वादातून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी यश तोमर उर्फ ठाकूर (वय २०) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

राजू कांबळे हा पंचशील नगर परिसरात महिलांची छेडछाड, चोरी, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे यांसारख्या कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अनेक वेळा त्याच्याविरोधात तक्रारी झाल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

ही घटना रविवारी (दि. ९ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजू कांबळे आणि आरोपी यश तोमर यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले आहे. या वादातूनच यशने रागाच्या भरात राजूच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत राजू खाली कोसळला आणि रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी यश तोमर याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, हत्येमागील नेमकी कारणे, पूर्वीचा वाद आणि घटनेची पार्श्वभूमी याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर पंचशील नगर परिसरात शांतता असून, नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या घटनेला दुर्दैवी म्हटले, तर काहींनी दीर्घकाळ चाललेल्या त्रासातून सुटका झाल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र, कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत असल्याबाबत चिंता देखील व्यक्त होत आहे.

समाजविघातक प्रवृत्ती आणि वाढती अस्वस्थता

एका गुन्हेगाराचा असा अंत होणे हे समाजातील वाढत्या अस्वस्थतेचे आणि कायद्यावरील विश्वास कमी होत चालल्याचे द्योतक मानले जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असतानाच, अशा घटनांमधून कायदा-सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी होणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे हीच समाजहिताची दिशा असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT