Washim Wife And Lover Arrested
वाशीम : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात आढळलेल्या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. पतीचा गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली. अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.
मृत सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) हे चार-पाच दिवसांपासून वाकळवाडी येथील सासरवाडीत आले होते. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी मृताची पत्नी आशा सुरेश झळके आणि महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळनाथ) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अनैतिक संबंधातून हत्येचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश झळके हे दोघांच्या कथित प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. ३० जुलै रोजी सुरेश यांना प्रथम मद्यपान करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर ते नशेत असताना दोरीने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सुरुवातीला मालेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराचा सहभाग समोर आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर तसेच चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.