LPG Cylinder  
वाशिम

LPG cylinder news | घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी तपासण्या करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा केवळ घरगुती वापरासाठीच उपयोग करावा व अवैध वापर किंवा काळाबाजार आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र व राज्य शासनाचे आदेश, नियम आणि मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सींच्या तपासण्या करण्याबाबत दक्षता पथक किंवा फिरते पथक स्थापन करण्याच्या शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक, पुरवठा निरीक्षक, पुरवठा निरिक्षण अधिकारी,वितरण कंपन्यांचे सेल्स ऑफिसर अशा संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासण्या कराव्यात, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिले आहेत.

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा अन्य अवैध वापर होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. यासोबतच संबंधित विभागांनी केलेल्या तपासण्या व कारवाईचा अनुपालन अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा केवळ घरगुती वापरासाठीच उपयोग करावा व अवैध वापर किंवा काळाबाजार आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT