वाशीम : कारंजा शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शनिवारी सकाळी एका गाईने शाळेत जाणाऱ्या मुलावर आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये, भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहरातील मोठ्या राममंदिर परिसरात काही शाळकरी मुले आपल्या पालकांसोबत शाळेत जात होती. त्याचवेळी अचानक एका मोकाट गाईने एका महिलेवर आणि तिच्यासोबत असलेल्या शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला चढवला. सुदैवाने, या हल्ल्यात महिला आणि मुलगा थोडक्यात बचावले. मात्र, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. "जर या हल्ल्यात कोणाच्या जीवितास हानी झाली असती, तर त्याला जबाबदार कोण? जनावर मालक की संबंधित प्रशासन?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
भटक्या श्वानांचीही दहशत
एकीकडे मोकाट गुरांचा त्रास असतानाच, दुसरीकडे भटक्या श्वानांनीही शहरात दहशत निर्माण केली आहे. शहरात त्यांचा मुक्त संचार असून, नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या केवळ दोन महिन्यांत श्वानदंशाची तब्बल ४१० प्रकरणे कारंजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाली आहेत. या आकडेवारीमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ
काही दिवसांपूर्वीच कारंजा नगरपालिकेच्या प्रशासनाने शहरभरात लाऊडस्पीकरद्वारे सूचना देऊन जनावरांच्या मालकांना आपली जनावरे मोकाट न सोडण्याचे आवाहन केले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या सूचनांचा जनावरांच्या मालकांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मोकाट जनावरे रस्त्यात ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघातांचा धोकाही वाढला आहे.
शहरातील या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येवर गांभीर्याने लक्ष घालून मोकाट जनावरे आणि श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता शहरवासीयांमधून होत आहे.