वाशिम : वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात आज सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंडामधून अचानक गरम पाण्याच्या वाफा निघू लागल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्याची लाट पसरली आहे.
पौराणिक महत्त्व असलेल्या या मंदिरातील कुंडात आजवर नेहमी थंड पाणीच आढळत होते. मात्र आज सकाळी काही भाविकांनी कुंडाच्या मध्यभागी असलेल्या गोल खळग्यातून गरम पाण्याचा झरा वाहताना पाहिल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कुंडातील पाणी बादलीने भरून पाहण्यात आले असता ते प्रत्यक्षात गरम असल्याची खात्री झाली.
या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही नागरिकांनी याला दैवी चमत्कार मानत विशेष पूजा-अर्चा सुरू केल्या आहेत, तर पर्यावरण अभ्यासक आणि काही जाणकार नागरिकांनी जमिनीखालच्या भूगर्भीय हालचाली, उष्णजलस्तरात झालेला बदल किंवा हवामानातील परिणाम यावर संभाव्य कारणे म्हणून लक्ष वेधले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरात भाविकांची आणि स्थानिकांची मोठी गर्दी उसळली. यामुळे परिसरात काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभाग आणि हवामान विभाग यांना तात्काळ माहिती देण्यात आली असून, लवकरच भूवैज्ञानिक आणि जलतज्ज्ञांची विशेष टीम तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण घटनेबाबत शृंगऋषी संस्थानचे पुजारी सुशांत कौंडिण्य यांनी सांगितले की, "गेल्या कित्येक दशकांपासून कुंडातील पाणी थंड असते. मात्र आज प्रथमच गरम पाणी बाहेर येताना आम्ही पाहिले. ही एक अनोखी आणि आध्यात्मिक अनुभूती आहे." दरम्यान, तोपर्यंत या गरम पाण्याच्या झऱ्याचे गूढ मात्र कायम असून, भाविकांमध्ये याबाबत उत्सुकता आणि श्रद्धेचे वातावरण आहे.