उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने मालेगाव येथे अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली. Pudhari Photo
वाशिम

वाशिम : जुगार अड्ड्यावर छापा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

११ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने मालेगाव येथे ४ मार्च रोजी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली. जुन्या बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून २,१०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ११ जणांना अटक करून त्यांच्या विरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना गुप्त माहिती मिळाली की, मालेगाव येथील जुन्या बसस्थानकाजवळ काही जण जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बस स्टँड परिसरात छापा टाकला असता आरोपी जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता रोख रक्कम, वरली मटका जुगाराच्या चिठ्ठ्या, हिशोबाच्या नोंदी, जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कॅल्क्युलेटर, मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण २,१०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रमेश शिवलाल राठोड, अनिल सुदाम कांबळे, गोपाळ सुर्यभान खुळे, विलास नारायण कुटे, गणपत गोविंदा धोंगडे, विजय गोपाळ बोरकर, बाळू भगवान सावळे, प्रविण मधुकर कानेड, महादेव किसन सरकटे, अशोक ओंकार वानखेडे आणि नंदू तुळशिराम खडसे या ११ आरोपींवर मालेगाव येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.

ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल, पोहेकॉ. अरविंद राठोड, पोहेकॉ. हरिभाऊ कालापाड, पोकॉ. स्वप्नील शेळके, पोकॉ. शंकर वाघमारे, पोकॉ गणेश बाजड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार खेळणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT