Life Imprisonment Pudhari
वाशिम

Washim Crime | मालेगावातील जावयाच्या खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

मालेगाव तालुक्यातील मेडशी गावातील घटना, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Washim Life Imprisonment Sentence

वाशिम : जावयाचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल मंगळवारी (दि. 28) देण्यात आला. ही घटना मालेगाव तालुक्यातील मेडशी गावातील आहे.

या प्रकरणातील आरोपी कामिनी किशोर राठोड, किशोर रुपचंद राठोड, राहुल रुपचंद राठोड आणि कविता रुपचंद राठोड यांचा जावई मुकेश चव्हाण हा त्यांच्या शेजारी राहत होता. मुकेश चव्हाण याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपींच्या मनात त्याच्याविषयी तीव्र राग निर्माण झाला होता.

7 डिसेंबर 2022 रोजी मुकेश चव्हाण घरासमोरून जात असताना आरोपींनी त्याला घरात ओढून नेले, दरवाजा बंद करून मारहाण केली आणि गळा आवळून त्याचा खून केला. या वेळी मृतकाची पत्नी प्रतिभा चव्हाण हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिलाही मारहाण करून बाहेर काढले आणि पुन्हा दरवाजा बंद करून गुन्हा केला.

या घटनेनंतर प्रतिभा चव्हाण यांनी त्याच दिवशी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 323 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सरकार पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी प्रतिभा चव्हाण या न्यायालयात फितूर झाल्या, तरीही इतर साक्षीदारांच्या आधारे सरकार पक्षाने आरोपींचा गुन्हा सिद्ध केला.

या प्रकरणात सरकारी वकील अॅड. पुरुषोत्तम ढोबळे यांनी बाजू मांडली, तर अॅड. संगीता जाधव यांनी त्यांना सहकार्य केले. पुरावे आणि युक्तिवादांच्या आधारे न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी चारही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याशिवाय, फिर्यादी प्रतिभा चव्हाण फितूर झाल्यामुळे त्यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच तपास अधिकारी पुष्पलता वाघ यांच्या तपासातील त्रुटींवरही पोलीस अधीक्षकांमार्फत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT