Court News file photo
वाशिम

Washim News : जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला ५ वर्षे सश्रम कारावास

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : देपुळ (ता. वाशीम) येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला वाशीम येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी प्रत्येकी पाच-पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन्ही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, या दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये गंभीर जखमी समाधान वाघमारे यास भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देपूळ गावात १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी मोसीन शहा मन्सूर शहा आणि मन्सूर शहा गुलाब शहा यांनी लक्ष्मीबाई तुळशीराम वाघमारे हिचा नातू समाधान शालिकराम वाघमारे यांना जुन्या वादातून कुऱ्हाड व सूरीने गंभीर वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसेगाव पोलीस ठाण्यात चार आरोपी विरुद्ध कलम ३०७ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांच्या न्यायालयात मंगळवारी (दि.४) सुनावणी झाली. यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. चार आरोपींपैकी दोन आरोपीतांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी पाच-पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. सबळ पुराव्याअभावी शागिराबी मन्सूर शहा आणि सलमाबी ऊर्फ माया अख्तर शहा यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच नुकसान भरपाई म्हणून जखमी समाधान शालिकराम वाघमारे यांना दंडाची रक्कम ४० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात सरकारच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली. पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. महिला पोलीस कॉन्स्टेबल (एलपीसी) परविन भुरीवाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT