वाशिम, पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, परितक्त्या विधवा, शेतकरी समस्या व दिव्यांग यांच्या विविध समस्या तसेच अर्थसहाय्य अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी आज (दि. ४) सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.
या मोर्चामध्ये शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी द्यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम त्वरीत अदा करावी, पीक विम्याची रक्कम त्वरीत द्यावी, पंतप्रधान किसान सन्मान योजना, आधार कार्ड लिंक व केवायसी करुन त्वरीत अनुदान वितरीत करावे, रासायनीक खताची दरवाढ त्वरीत रद्द करावी, खतासोबत इतर औषधे जबरीने देवू नये. ग्रामीण भागात व नागरी क्षेत्रात पंतप्रधान अवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना यामध्ये १ लाख २० हजार रुपयांवरुन ३ लाख रुपये एव्हडी रक्कम करावी, शहरी भागात पतप्रधान आवास, रमाई आवास योजना २ लाख ५० हजारावरुन ५ लाख रुपये करण्यात यावी.
संजय गांधी निराधार योजना यामध्ये दिलेल्या जाणार्या १५०० रुपये अनुदानामध्ये वाढ करुन 3 हजार रुपये करण्यात यावे, जि.प., पं.स. ग्रा.पं. नगर पालिका व नगर पंचायत यांना प्राप्त होणार्या विकास निधीमधून दिव्यांगाकरीता राखीव असलेल्या ५ टक्के निधी दिव्यांगावर खर्च करावा. राज्यातील बोगस अपंग शाळा, वस्तीगृह शाळा यांची चौकशी करुन त्या बंद कराव्या, ज्या दिव्यांगांच्या परिवारात ३ एकर कोरडवाहू, व एक एकर ओलीताची शेती आहे. अशा दिव्यांगांना योजनांचा लाभ द्यावा, दिव्यांगांना वित्त व विकास महामंडळाने दिलेली कर्जे त्वरीत माफ करावीत. दिव्यांगांना लघुउद्योग व निवासासाठी २०० स्के.फुट जागा देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.