Char Dham Yatra : चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन बुकिंग  file photo
वाशिम

Char Dham Yatra Fraud | चारधाम यात्रेच्या नावाखाली सायबर फसवणूक; अनोळखी लिंकवरून बुकिंग टाळा

वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खतमोडे-पाटील यांचे भाविकांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Online Travel Fake Booking Links

वाशिम : चारधाम यात्रेच्या नावाखाली ऑनलाइन होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खतमोडे-पाटील यांनी केले आहे. हेलिकॉप्टर सेवा, हॉटेल आरक्षण तसेच टूर-ट्रॅव्हल पॅकेजच्या ऑनलाइन बुकिंगपूर्वी संबंधित वेबसाइट व बुकिंगची माहिती अधिकृत असल्याची खात्री करूनच पेमेंट करावे, असे त्यांनी सांगितले.

उत्तराखंड सरकारने महाराष्ट्रातून चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध असली तरी हेलिकॉप्टर बुकिंग, हॉटेल आरक्षण आणि टूर पॅकेज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइट व लिंकच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

सायबर गुन्हेगारांकडून शोध इंजिनच्या निकालांमध्ये दिसणाऱ्या बनावट वेबसाइट आणि लिंक तयार केल्या जात असल्याची माहिती आहे. गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर चारधाम यात्रेशी संबंधित माहिती शोधताना नागरिक अनवधानाने अशा बनावट वेबसाइटवर जाऊ शकतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करणाऱ्या यात्रेकरूंनी केवळ अधिकृत heliyatra.irctc.in या वेबसाइटचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उत्तराखंड पर्यटन विभागाने +91-8394833833 हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यात्रेकरू नोंदणी तसेच यात्रेसंदर्भातील आवश्यक माहिती मिळविण्यासाठी या क्रमांकावर ‘Yatra’ असा संदेश पाठवता येतो.

अनोळखी वेबसाइट, लिंक, सोशल मीडियावरील जाहिराती किंवा चारधाम यात्रा सेवा देण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट करू नये. कोणतेही बुकिंग अथवा पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची सत्यता, संपर्क क्रमांक आणि उपलब्ध माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी.

ऑनलाइन प्रवास व बुकिंग सेवा शोधताना नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, फसव्या लिंक आणि वेबसाइटपासून दूर राहावे आणि सुरक्षित तीर्थयात्रेसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक निकेश खतमोडे-पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT