वाशिम; पुढारी वृत्तसेवा : एकाच आठवड्यात सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर दोन्ही घटनेतील हल्लेखोर पकडण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.
9 आक्टोबर रोजी भर दिवसा जिल्हा परिषद शिक्षक दिलीप सोनुने यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात आणखी एक खुनाची घटना घडली. बुधवारी (दि.11) रात्री साडे नऊच्या दरम्यान ग्राम एरंडामध्ये भर वस्तीत हनुमान मंदिराच्या पारावर अज्ञात हल्लेखोराने एका व्यक्तीवर रॉडने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. गजनन उत्तम सपाटे (वर्ष ४५, एरंडा, ता. मालेगाव) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली असल्याची चिंता नागरिकातून व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी किशोर वानखेडे हे घटना स्थळी पोहोचले होते. घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा आरज, ठाणेदार प्रदीप राठोड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही घटना शेतीच्या वादातून घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.