वाशीम : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वाशीम नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे यांच्याविरुद्ध त्यांचा मुलगा शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांची उमेदवारी खारीज करण्या संदर्भात विरोधी पक्षाच्या वतीने प्रवीण वसंत मापारी यांनी वाशीम येथील जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात आवाहन दिले होते. त्यावर निर्णय देतांना विद्यमान न्यायालयाने ‘न्याय’ देत विरोधकांचे अपील खारीज करुन भाजपा उमेदवार अनिल केंदळे यांच्या बाजूने निकाल देत विरोधकांचे मनसुबे उधळले.
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत विरोधकांनी टाकलेला अपात्रतेचा बॉम्ब निष्प्रभ ठरवत, न्यायालयाने अपीलकर्त्याची याचिका फेटाळून लावली! भाजपचे उमेदवार अनिल केंदळे हे निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.
२६ नोव्हेंबर पासून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशा अत्यंत तणावपूर्ण आणि निर्णायक क्षणी न्यायालयाचा हा निकाल भाजपा पक्षाच्या बाजूने आल्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवार रेखा सुरेश मापारी यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक असल्याचे बोलल्या जात आहे. भाजपा उमेदवार अनिल केंदळे यांच्यावतीने अॅड. सुधीर मोरे यांनी सक्षमपणे बाजू मांडली.