वाशिम: शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यासाठी आयोजित कार्यक्रमातच 'अन्नदाता' उपाशी राहिल्याचा आणि त्याबद्दल जाब विचारताच एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये घडला आहे. एवढ्यावरच न थांबता, या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या हातातून संबंधित अधिकाऱ्याने मोबाईल हिसकावून घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाशिम येथील 'आत्मा' विभागाच्या वतीने 'शाश्वत शेती दिना'निमित्त शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नियोजन कोलमडल्याने अनेकांना जेवण मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आयोजकांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
यावेळी परिस्थिती हाताळण्याऐवजी 'आत्मा' विभागाच्या प्रकल्प संचालक, अनिसा महाबळे, या शेतकऱ्यांवरच भडकल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावीच्या भाषेत संवाद साधल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच, महाबळे यांनी थेट त्या शेतकऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला, ज्यामुळे वातावरणातील तणाव अधिकच वाढला.
विशेष म्हणजे, तत्कालीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर माध्यमांनी अनिसा महाबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शेतकऱ्यांशी कोणताही गैरसमज झाला नाही आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे ज्यांच्यासाठी योजना राबवल्या जातात, त्या शेतकऱ्यांनाच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.