Viral video of Maharashtra farmer
महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर आहे. यामुळे रब्बी पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून एक संकटग्रस्त शेतकरी जोरदार पावसात पाण्यात वाहून जाणारे भुईमूग पीक वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
धुवाँधार पावसातील प्रसंगाचा हा व्हिडिओ वाशिम जिल्ह्यातील एका बाजारातील आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गौरव पनवार आहे. त्याची पाण्यातून वाहून जाणारा भूईमूग अडविण्याची केविलवाणी धडपड यातून दिसून येते. या व्हायरल झालेल्या शेतकऱ्याच्या व्हिडिओची केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) यांनी दखल घेतली आहे.
या त्रस्त शेतकऱ्याचे दृश्य पाहून चौहान यांनी पनवार यांना थेट फोन केला आणि सरकार तुम्हाला नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. "या व्हिडिओने मला खरोखर दुःख झाले," असे चौहान यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ चौहान यांच्या कार्यालयाने X अकाउंटवर शेअर केला आहे.
"पण तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री आणि स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. तुम्हाला तुमच्या शेतपिकाची भरपाई मिळेल. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत आहोत." असे म्हणत चौहान यांनी गौरव पनवार या शेतकऱ्याला धीर दिला.
''महाराष्ट्राचे शेतकरी भाऊ गौरव पनवार यांचा सोशल मीडियावर हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून माझे मन हेलावून गेले. अवकाळी पावसामुळे बाजारात ठेवलेले त्याचे भुईमूग पीक वाहून गेले. मी स्वतः एक शेतकरी असल्याने, मी त्याचे दुःख समजू शकतो. मी गौरवजी यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना धीर दिला. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.'' असे चौहान यांनी म्हटले आहे.
चौहान यांच्याशी फोनवर बोलताना पनवार यांनी म्हटले केले की, पीक वाचवण्याची धडपड करताना पावसात भिजलो. यामुळे मी आजारी पडलो आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.