वर्धा : वडिलांनी आईला शिवीगाळ केल्याचा रागातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली. ही घटना मंगळवारी (दि.४) देवळी येथील इंदिरानगर परिसरात सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथील इंदिरानगरमध्ये नारायण चिंधुजी कुरवाडे (वय ५८) पत्नी आणि मुलगा नारायण कुरवाडे यांच्यासमवेत राहत होते. त्यांचा नेहमी पत्नीबरोबर वाद व्हायचा. घटनेच्या दिवशी पत्नीबरोबर जोरदार भांडण झाले. यावेळी त्यांनी पत्नीला शिवीगाळ केली. या वादाबाबतची माहिती मुलगा नामदेव कुरवाडे याला कळाली. त्यानंतर त्याने रागाने घर गाठत वडिलांना याचा जाब विचारला. त्यानंतर त्याचे जोराचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात मुलाने वडिलाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला. त्यात नारायण कुरवाडे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आर.एम.शिंदे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मगरे, नितीन चौधरी, गजबे तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचा तपास देवळीचे ठाणेदार आर. एम. शिंदे करीत आहेत.