पंकज गादगे, वर्धा
Wardha Crime News
वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी राहुल राजू मडावी याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालिका बुधवारी (१५ जुलै) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आली होती. तिचे कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बालिकेची आई आणि मोठी बहीण शेतातील घरी परतल्या, तेव्हा त्यांना बालिकेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.
प्राथमिक तपासानुसार, बालिकेची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यासंबंधीची कलमे गुन्ह्यात समाविष्ट केली आहेत. मात्र, अत्याचाराबाबतचा अंतिम निष्कर्ष उत्तरीय आणि न्यायवैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
शाळेतून घरी परतलेल्या चिमुरडीला काय माहीत होतं, की तो तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे... काही तासांनंतर आई घरी पोहोचली, तेव्हा समोर होतं ते काळीज पिळवटून टाकणारं दृश्य... शेतातील घरात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह... कुटुंबियांच्या आक्रोश, मुलीची करण्यात आलेली अमानुष हत्येने संपूर्ण गावच सून्न झाले.
शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मुलीच्या अमानुष हत्येमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले. सकाळी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. 'आधी आरोपीला अटक करा... न्याय द्या...' अशी मागणी करत नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. काही काळासाठी संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत मृतदेह शवविच्छेदनगृहातच राहिला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.
आमदार राजेश बकाने, खासदार अमर काळे आणि विविध सामाजिक संघटनांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी अखेर मृतदेह स्वीकारला. मात्र, ॲम्बुलन्स रुग्णालयातून बाहेर पडताच संतप्त नागरिक तिच्यामागे धावत गेले. या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.