Drug Racket Pudhari
वर्धा

Wardha drug racket | ड्रग्ज माफियांना पोलिसांचा दणका! वर्ध्यात 'ड्रग फ्री वर्धा ऑपरेशन'द्वारे १०० आरोपींची झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

वर्धा: जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या मोहिमेला आता पोलीस प्रशासनाने अधिक तीव्र केले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ ते २ मार्च दरम्यान ‘ड्रग फ्री वर्धा ऑपरेशन’ राबविण्यात आले. या दोन दिवसीय धडक मोहिमेत गेल्या १० वर्षांतील १६० आरोपींची कसून तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्याभरातील ड्रग्ज विक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या.

मोठ्या फौजफाट्यासह धाडसी मोहीम

अंमली पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी हे विशेष अभियान आखण्यात आले होते. या मोहिमेत वर्धा, आर्वी, पुलगाव आणि हिंगणघाट या चारही उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके सहभागी झाली होती. एकूण ४० पोलीस अधिकारी आणि १२० पोलीस अंमलदारांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ही कारवाई पूर्ण केली.

तपासणीचा तपशील आणि कारवाई

दोन दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी जुन्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एनपीडीएस (NDPS) कायद्यांतर्गत गेल्या १० वर्षांत गुन्हे दाखल असलेल्या १६० आरोपींपैकी १०० आरोपींना शोधून त्यांची प्रत्यक्ष तपासणी व घरझडती घेण्यात आली. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या २८ अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित १५ आरोपी सध्या कारागृहात आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरण्यात येणारी ४४ वाहने पोलिसांनी तपासली. तसेच, अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ६२ संशयास्पद ठिकाणांचा शोध घेऊन तिथे वारंवार छापे टाकण्यात आले.

पोलीस प्रशासनाचा इशारा

मिळून न आलेल्या गुन्हेगारांबाबत पोलिसांकडून गुप्त माहिती गोळा केली जात असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे यशस्वी ऑपरेशन राबविण्यात आले. वर्धा जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दल सज्ज असून, अशा बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असलेल्यांवर यापुढेही कठोर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT