वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी 20 मे रोजी दुपारच्या सुमारास वादळ, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान अंगावर वीज कोसळल्याने तळोदी शिवारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच चाणकी शिवारात बैलजोडी ठार झाली. वादळात घरांचेही नुकसान झाले.
मंगळवारी 20 मे रोजी दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह विजांचा कडकडाट झाला. यादरम्यान काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. सेलू तालुक्यातील तळोदी येथे शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यात बळीराम परचाके यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी सेलूचे तहसीलदार विराणी यांनी भेट दिली. सेलू तालुक्यातील चाणकी शिवारात वीज पडल्याने बैलजोडीचा मृत्यू झाला. त्यामध्ये शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. समुद्रपूर तालुक्यातील वडगाव येथे वादळात काही घरांचे छत उडाल्याने मोठे नुकसान झाले. सध्या शेतात तीळ काढण्याची कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे तिळ तसेच इतर पिकांचे नुकसान झाले. पाऊस, वादळामुळे तिळ काढण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.