वर्धा

Wardha News : दंडात्मक कारवाईमुळे संतापलेल्या चालकाने समृद्धीवर रोखली वाहतूक, ट्रक आडवाच उभारल्याने वाहतुकीचा खोळंबा

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : समृद्धी महामार्गावर एका लेनवर भररस्त्यात ट्रकचालकाने गाडी आडवी उभी केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गणेशपूर शिवारात ट्रक रस्त्याच्या मध्यभागी उभा करून चालक पसार झाला होता. या प्रकारामुळे महामार्गावर तब्बल पाऊण ते एक तास वाहतूक ठप्प झाली होती. 'चॅनेज ६१' परिसरात रविवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक गणेशपूर भागातील एका पेट्रोल पंपाजवळ आला असता, एआरटीओ (ARTO) च्या पथकाने तो थांबवला. तपासणीदरम्यान कागदपत्रांत त्रुटी आढळल्याने अधिकाऱ्यांनी चालकाला दंड (ई-चालान) ठोठावला. या कारवाईचा राग आल्याने ट्रकचालकाने गणेशपूर परिसरातील 'चॅनेज ६१' जवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आपला ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा उभा केला आणि तेथून पळ काढला.

भररस्त्यात ट्रक उभा राहिल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची लांबलचक रांग लागली आणि वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच सावंगीचे ठाणेदार विनोद गिरी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने क्रेनच्या साहाय्याने ट्रक रस्त्यावरून बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाऊण ते एक तास तीव्र मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT