वर्धा

Wardha News : फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट; भीषण आगीत घराचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : देवळी येथे एका घराच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंच्या खोलीत फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागून घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

देवळी शहरातील नगरपरिषद लेआउटमधील लेंडे यांच्या घरी पहिल्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या वैद्य यांच्या घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा हा स्फोट झाला. घरातून धुराचे लोळ येत असल्याचे घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने देवळी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. दरम्यान, जवानांनी घरात असलेला गॅस सिलिंडर शिताफीने बाहेर काढल्यामुळे सिलिंडरचा संभाव्य स्फोट व मोठा अनर्थ टळला.

मात्र, या आगीत घरातील कपाट, गाद्या, दिवाण, दरवाजे, पंखे, कपडे यासह बहुतांश गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक विभागाचे कर्मचारी अभिषेक काळे, अकिल फारुखी आणि आसिफ शेख यांनी मोलाचे प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले, ज्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT