वर्धा : अमेरिका इस्त्राईल इराण युद्धाचा विविध घटकांवर परिणाम होत आहे. अशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशा नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसे आदेश अधिकाऱ्यांनी निर्गत केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात सध्या घरगुती एलपीजी सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बाजारात कुठे सिलिंडर साठवून ठेवणे किंवा जास्त दराने विक्री करण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचाही मुबलक साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
संबंधित पेट्रोलियम कंपन्यांशी प्रशासनाचा सतत संपर्क सुरू असून पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही एलपीजी सिलिंडरची साठेबाजी, काळाबाजार किंवा नियमबाह्य विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.