वर्धा ः सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहित नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे १५३७ नागरिकांनी रक्ताने पत्र लिहिले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीची पत्रे मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) नगर परिषद असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सिंदी (रेल्वे)ला अनेक गावे जोडलेली आहेत. उपचाराकरिता येथे नागरिकांना यावे लागते. मात्र गंभीर रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आले. अनेक निवेदने देण्यात आली. मात्र ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्याचे आंदोलन करण्यात आले.
सिंदीवासियांनी स्वतःच्या रक्ताने थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. ग्रामीण रुग्णालय द्या, असा संदेश या पत्रांतून देण्यात आला आहे. गुरुवारी ५३७ जणांनी, शुक्रवारी ५०८ जणांनी तर शनिवार ४९२ जणांनी रक्त काढून पत्र लिहिले. तीन दिवसांत तब्बल १५३७ रक्तपत्रे लिहिण्यात आली. तीन दिवसीय आंदोलनात स्वयंस्फूर्त सहभागाने आंदोलनस्थळी रांगा लागल्या होत्या आंदोलनात सिंदी (रेल्वे) येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
खासदार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनी रक्ताने पत्र लिहुन आंदोलनात सहभागी होत समर्थन दिले. माजी आमदार राजु तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी आदी मान्यवरांनी भेट देऊन समर्थन दिले. शासनाने मागणीची दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.