वर्धा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार करून हत्या केल्याची घटना देवळी येथील इंदिरानगर परिसरात २ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्यातील चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
गजानन किशोर पाटणकर (वय ४२ वर्षे, रा. देवळी) असे मृतकाचे नाव आहे. देवळी येथील गजानन पाटणकर आणि आरोपी यांच्यामध्ये सिगारेट पिण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. यावरून २ नोव्हेंबर रोजी पहाटे मृतक मित्राला सोडण्यासाठी इंदिरानगर, देवळी येथे गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्या वाहनास आडवे येऊन त्यास अडविले. यावेळी आरोपींनी मृतकास पकडून ठेवून त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गजानन पाटणकर याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्यातील चार मुख्य आरोपींना अटक केली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.
याप्रकरणी देवळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अमन संतोष टेकाम, ओम रमेश सावरकर, प्रणय ज्ञानेश्वर राठोड, मनोज ज्ञानेश्वर राठोड सर्व राहणार देवळी या चार जणांना अटक केली. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा तपास ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक कमलेश मगरे व देवळी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.