वर्धाः शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे अनेक भागांचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तातडीने पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात यावी तसेच पाणी पुरवठा होत नसलेल्या भागाला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे आदेश राज्याचे गृह मंत्री (ग्रामीण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, खनिकर्म व सहकार खात्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी २३ डिसेंबर रोजी दिले.
वर्धा नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना येळाकेळी व पवनार येथील पंपिंग स्टेशनवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु येळाकेळी येथून येणारी मुख्य पाईपलाईन जुना पाणी चौकात लिकेज झाल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर झालेला आहे. मागील पाच दिवसांपासून शहरातील आर्वी नाका परिसर, प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, गजानन नगर, बॅचलर रोड, साबळे प्लॉट, राधा नगर, मानस मंदिर परिसर, गोरस भंडार कॉलनी, गांधी नगर, साने गुरुजी नगर, सुदामपुरी,. गोंड प्लॉट, यशवंत कॉलनी, खडसे ले आउट, इंदिरा नगर, केळकर वाडी परिराला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड अडचण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्याअनुषंगाने सोमवारी स्थानिक विश्रामगृह येथे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा प्रशासन, नप व जिप अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीला जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रभारी जिल्हाधिकारी नितीन फुलझले, नपचे मुख्याधिकारी राजेश भगत, नप पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, माजी सभापती निलेश किटे,पवन राऊत, प्रशांत बुर्ले, माजी नगरसेवक गोपी त्रिवेदी, अभिषेक त्रिवेदी, महेश भाटिया, भाजपाचे शहर अध्यक्ष निलेश पोहेकर, मदन चावरे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शहरातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेऊन जुना पाणी चौकातील लिकेज दुरूस्तीच्या कामाची माहिती जाणून घेतली. पाच दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने खास करून महिला वर्गाची मोठी अडचण होत असल्याचे सांगितले. अनेकांच्या घरी बोरवेआ व विहिर नसल्याने त्यांना नपच्या पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागते. मात्र पाच दिवासापासून पाणी पुरवठा होत नसल्याने त्यांच्या वणवण भटकण्याची पाळी आली आहे. तथापि, या भागाला नपच्यावतीने टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे आदेश दिले. तसेच लिकेजचे काम तातडीने पुर्ण करून शहराला पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी युद्धस्तरावर कार्य करण्याचे निर्देश दिले. नप चे मुख्याधिकारी भगत यांनी तातडीने पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती देऊन लिकेजचे देखील काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली