वर्धा : मल्टीट्रेडींग फर्म माध्यमातून ट्रेंडींग केल्यास गुंतवणुकीच्या केलेल्या रकमेवर परताव्याचे आमिष दाखवून काहींची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणातील दोघांना मंगळवारी (दि.२) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन वाहने, महागडे मोबाईल, एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
पीव्हीआर मल्टीट्रेडींग लॅब वर्धा या फर्मच्या माध्यमातून ट्रेडींग केल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवून फिर्यादीसह अनेकांकडून आरोपींनी रक्कम घेतली. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी त्याबाबतचे हमीपत्रदेखील लिहून दिले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर सुरुवातीला मोबदला देवून नंतर मात्र परतावा देण्याकरीता टाळाटाळ करुन फिर्यादीसह इतरांची ६२ लाख २ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीव्हीआर मल्टीट्रेडींग लॅब फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्बत (वय ३०) रा. गणेशनगर, बोरगांव (मेघे) वर्धा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. आरोपी परराज्यात राहुन राहण्याचे ठिकाण नेहमी बदलत होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विक्रम ज्ञानेश्वर पर्वत याला नागपूर येथून अटक केली. तसेच त्याला सहकार्य करणारा किरण हिरासिंग पवार (वय २९, रा. किन्नी किनाळा, ता. घाटंजी जि. यवतमाळ) यालाही अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून ९ मोबाईल, लॅपटॉप, २२ एटीएम कार्ड, रोख व सोन्याच्या अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैसे देवून दुसर्याच्या नावाने खरेदी केलेल्या महागड्या दोन कार असा ४४ लाख १३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. गुन्हयात बँकेतील रोख रक्कम ८ लाख ७१ हजार ११६ रुपये तसेच आरोपींनी वर्धतौक खासगी फायनान्स वर्धामध्ये गहाण ठेवलेले ५५८.२ ग्रॅम सोने व खासगी फायनान्स कोलकाता येथे गहाण ठेवलेले अंदाजे २०० ग्रॅम सोनेसुध्दा गोठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, निकेश गुजर, कुनाल डांगे, स्वनिल भारव्दाज, दिनेश बोधकर, प्रतिक नगराळे, मनोज झाडे, संतोष जयस्वाल, राजेश पचारे यांनी केली.