वर्धा : भरधाव ट्रकने समोर थांबलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना समुद्रपूर तालुक्यातील जाम परिसरात रविवारी (दि. ४) दुपारी घडली. शिवकुमार रामसिंग यादव (वय ४४, रा. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिवकुमार यादव हे आपला ट्रक (क्रमांक यूपी ३२ आरएन ९५०२) घेऊन नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने निघाले होते. ते नागपूर-जाम महामार्गावर आले असता त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. व भरधाव ट्रक समोरील ट्रकला जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन ट्रकचालक शिवकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जाम येथील पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह चंद्रकांत जीवतोडे, विकास काकडे, रणजित फाले, महेंद्र ठेंगळे यांनी घटनास्थळ धाव पंचनामा केला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून वाहनधारकांना मोकळी वाट करून दिली.