Heatwave Pudhari
वर्धा

Wardha Heatwave : वर्ध्यात तापमानाचा उच्चांक, पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर; उष्णतेच्या तीव्र लाटेने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : विदर्भासह वर्धा जिल्ह्याला सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा जबर फटका बसत असून, तापमानवाढीने अक्षरशः कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या पाऱ्याने बुधवारी (२० मे) थेट ४७.१ अंश सेल्सिअसची नोंद केली. हा या चालू मोसमातील तापमानाचा सर्वोच्च उच्चांक ठरला असून, वाढत्या उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्याने वर्धेकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा असह्य होऊ लागल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. त्यामुळे नेहमी वर्दळ असणारे शहरातील मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी वाहतूक आणि बाजारपेठांमधील व्यवहारही मंदावले आहेत. त्यातच वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे (लू) पादचारी आणि दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ४७.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच, पुढील काही दिवस विदर्भातील उष्णतेची ही तीव्र लाट अशीच कायम राहण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, दुपारच्या वेळी बाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्यासाठी जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT