Wardha District Well Digging Restriction
वर्धा : जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे संवर्धन, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि आगामी काळात संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन बोअरवेल व विहिरींचे खोदकाम तसेच अस्तित्वातील बोअरवेल व विहिरींचे अधिक खोलीकरण करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वान्मथी सी यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.
भूजलसाठ्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि अनियंत्रित बोअरवेल व विहिरींच्या खोदकामामुळे भूजलसाठ्यावर निर्माण होणारा अतिरिक्त ताण टाळणे, हा या आदेशामागील प्रमुख उद्देश आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 30 व 34 तसेच महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन बोअरवेल खोदणे, नवीन विहिरींचे खोदकाम करणे, नवीन बोअरवेल किंवा कूपनलिका खणणे तसेच अस्तित्वात असलेल्या बोअरवेल व विहिरींचे अधिक खोलीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहबांधकाम संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग, व्यावसायिक आस्थापना, संस्था तसेच बोअरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार, रिगमालक व यंत्रचालक यांना लागू राहणार आहे.
मात्र, अस्तित्वात असलेल्या विहिरी किंवा बोअरवेलचा नियमित वापर करण्यावर या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय पाणीपुरवठा कामांना नियमानुसार अपवाद देण्यात आला आहे. अशा कामांसाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वलिखित प्रशासकीय मंजुरी, आवश्यक तांत्रिक शिफारस आणि लागू भूजलविषयक परवानग्या घेणे बंधनकारक राहणार आहे. केवळ शासकीय यंत्रणेमार्फत काम होत असल्याच्या कारणावरून कोणत्याही कामाला आपोआप सूट मिळणार नाही.
यापूर्वीपासून सुरू असलेल्या प्रतिबंधित खोदकामाच्या कामांनाही या आदेशाच्या कक्षेत घेण्यात आले आहे. वैध परवानगी किंवा शासकीय अपवाद नसलेली नवीन बोअरवेल व विहिरींची खोदकामे तसेच अधिक खोलीकरणाची कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित मालक, कंत्राटदार व यंत्रचालक यांनी खोदकामाची यंत्रसामग्री सुरक्षित स्थितीत ठेवावी आणि उघडी विहीर किंवा बोअरवेलमुळे नागरिक, पशुधन अथवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लागू कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. परिस्थितीचा आढावा, भूजल उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची गरज आणि संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार करून या आदेशात आवश्यकतेनुसार बदल, शिथिलता किंवा रद्द करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येईल. तोपर्यंत हा आदेश वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.