Heavy Monsoon Wardha
वर्धा : विविध भागांत शनिवारी रात्रीच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी मंडळात तब्बल १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हिंगणघाट तालुक्यातील पोहणा मंडळात ७१.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान २५.६ मिमी नोंदविण्यात आल आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तर अल्प प्रमाणात कमी पाऊस झाला. दमदार पाऊस झालेला नसल्याने तूट मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जोरदार पाऊस नसल्याने अद्यापही विहिरींच्या, नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. अशात मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने काळजीचे वातावरण होते. पिकांवर परिणाम होऊ लागला आहे.
शनिवारी १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही भागात तर दमदार पाऊस झाला. पावसाची गरज असलेल्या पिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाचा विचार केला असता, वर्धा तालुक्यात २३.९ मिमी, सेलू ३५.४ मिमी, देवळी १२.६ मिमी, आर्वी १७.६ मिमी, आष्टी ५.७ मिमी, कारंजा २९.६ मिमी, हिंगणघाट २५.१ मिमी, तर समुद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ४५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी मंडळात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगणघाट तालुक्यातील पोहणा परिसरातही ७१.३ मिमी पावसाची नोंद झाल्याने ओढे-नाल्यांना पाणी आले. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाची नोंद झाली असली तरी पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही भागात रिमझीम पाऊस येत केवळ ढगाळ वातावरण राहिले.