वर्धा : डोडा अमली पदार्थ विक्री करणार्यावर कारवाई करत एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी दहा किलो डोडा अमली पदार्थ जप्त केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
अंमली पदार्थांची विक्री करणार्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून राबवण्यात येत आहे. पोलिसांनी गोपनिय माहितीवरून समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आजदा शिवारातील मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये छापा टाकला.
सुरेश शिवराज डारा (वय २७), रा. डारा की ढाणी दुगोली राजस्थान हा हॉटेलमध्ये मिळून आला. हॉटेलचे झडतीदरम्यान डोडा अंमली पदार्थ मिळून आला. सदर अंमली पदार्थ हा त्याच्या स्वत:च्या आणि मुबारीक खान रा. रूपडाका जि. पलवर राज्य हरियाणा ह.मु. मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल आजदा याच्या मालकिचा असून दोघेही हॉटेलमधून डोडा अंमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी १० किलो ४०० ग्रॅम डोडा अमली पदार्थ, मोबाईलसह २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवी पुरोहित यांनी केली.