Crime News Pudhari
वर्धा

Wardha Crime : ११५ गुन्ह्यांतील ११ लाखांच्या अवैध दारूवर फिरवला रोडरोलर; देवळी पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : देवळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही वर्षांत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या अवैध देशी-विदेशी दारूच्या साठ्यावर अखेर रोडरोलर फिरवून तो पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सन २०२१ पासून ते आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण ११५ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची कायदेशीररीत्या विल्हेवाट लावण्यात आली. देवळी येथील एका निर्जन स्थळी ही मोठी कारवाई पार पडली असून, यामध्ये एकूण ११ लाख १६ हजार २६० रुपये किमतीचा दारूसाठा नष्ट करण्यात आला.

न्यायालयाने जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर, ११ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या टप्प्यातील गुन्ह्यांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यात पहिल्या १०१ गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या ८ लाख ६२ हजार ६० रुपये किमतीच्या ५ हजार ४१६ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि इतर १४ गुन्ह्यांमधील २ लाख ५४ हजार २०० रुपये किमतीच्या १ हजार ९८० देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता. अशा प्रकारे एकूण ११५ गुन्ह्यांमधील ११ लाख १६ हजार २६० रुपयांच्या दारू साठ्यावर थेट रोडरोलर चालवून तो जागीच निकामी करण्यात आला.

न्यायालयाच्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा येथील अधिकारी, अंमलदार तसेच स्थानिक पंच आणि देवळी येथील पोलीस स्टाफ यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

सदर मोठी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशावरून, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, विमलनयन तिवारी, गणेश खेवले, संदीप वाघमारे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा येथील दुय्यम निरीक्षक डी. वाय. राऊत, दुय्यम निरीक्षक आर. यू. काष्टे आणि ३ अंमलदारांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेऊन ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT