वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल १२ दुकानांचे शटर वाकवून रोख रकमेसह ऐवज लंपास केला. ९ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ निर्माण झाली. आर्वी शहरातील मुख्य बाजारपेठ नेताजी मार्केटमधील क्रीष्णा किराणा भंडार, लक्ष्मी किराणा दुकान, टावरी किराणा दुकान, ताजदार किराणा दुकान, राजू किराणा स्टोअर्स, जयश्री किराणा स्टोअर्स, लक्ष्मी जनरल स्टोअर्स, क्रीष्णा किराणा स्टोअर्स, प्रकाश आत्मारामजी गुल्हाणे स्टोअर्स, जेठानंद गोकुलदास लालवाणी स्टोअर्स, संजय ट्रेडर्स, आदि ट्रेडर्स, हरिओम किराणा स्टोअर्स या दुकानांत चोरट्यांनी चोरी केली.
चोरट्यांनी दुकानातील रोकड, ऐवज आदी लंपास केले. चोरट्यांनी तब्बल बारा दुकानांचे शटर ओढून वाकवून दुकानांत प्रवेश करत चोरी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. हॉटेल व्यावसायिक पहाटे दुकान उघडण्याकरिता मार्केटमध्ये आले असता दुकानाचे शटर तुटल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती व्यावसायिकांना भ्रमणध्वनीवरुन दिली.
व्यावसायिकाला त्यांच्या दुकानाकडे जाताना विविध दुकानाचे शटर तुटल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दुकानदार बाजारपेठेत पोहोचले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, ठाणेदार सतीश डेहनकर यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. आर्वी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.