वर्धा : नागपूरकडुन यवतमाळच्या दिशेने जात असलेल्या खासगी प्रवासी वाहनाचा सेलूजवळील रमणा शिवारात अपघात घडला. वाहनाची टिप्परला धडक लागल्याने घडलेल्या या अपघातात १० ते १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर तुळजापूर महामार्गावर २२ ऑगस्ट नागपूरकडून यवताळच्या दिशेने खासगी प्रवासी वाहन जात होते. दरम्यान, सेलूजवळील रमणा फाट्याजवळ टिप्परला ओव्हरटेक करताना वाहनाची धडक झाल्याने अपघात घडला. यामध्ये दहा ते बारा जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस, महामार्ग पोलीस, रेस्क्यू टीम तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातामुळे मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक निरंजन वरभे, प्रवीण भोयर, उमेश उगले, जावेद धामिया, मंगेश राऊत व सुनिल चावरे यांनी तातडीने धाव घेत मदत केली. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.