वर्धा : काही दिवसांपूर्वी एसटी तिकिटाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ झाल्यानंतर तिकिटाच्या सुट्या पैशांची अडचण निर्माण होऊ लागली. सुट्ट्या पैशांवरून वादही होऊ लागले. प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.
यूपीआयने तिकिट काढण्याच्य आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.