वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यालगतच्या नागठाणा शिवारात अनियंत्रीत ट्रक दुकानाच्या संरक्षक भिंतीवर धडकला. यावेळी ट्रकला अचानक आग लागली. त्यामध्ये ट्रकचे साहित्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
नागपूर येथून ट्रकमध्ये एका कंपनीचे खाद्यपदार्थ भरून कर्नाटक राज्यात नेले होते. शांतीनगर परिसरातील उड्डाणपूल ओलांडताना अचानक ट्रकचा वेग वाढला आणि ट्रक अनियंत्रीत झाला. चालकाकडून ट्रक नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असताना ट्रक रस्त्याच्या खाली उतरून थेट भिंतीला धडकून दुकानाच्या परिसरात शिरला. ट्रक दुकानाच्या भिंतीवर जाऊन धडकला. यादरम्यान ट्रकला आग लागली. त्यात ट्रक आगीत जळाला. जखमी ट्रक चालकाला नागरिकांनी धाव घेत ट्रकमधून बाहेर काढले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. वर्धा नगरपरिषदेतील अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती आहे. पोलिस निरीक्षक पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख, दुधाने, नितेश अंबुडारे, गजानन मस्के, गणेश सातपुते यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मदतकार्य केले. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.