प्रातिनिधीक छायाचित्र  Pudhari
वर्धा

Stray animals : मोकाट जनावरे सार्वजनिक रस्त्यावर सोडणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी केले गुन्हे दाखल!

अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे अपघाताची शक्यता : वाहनचालकांच्या सुरक्षिततेस धोका

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : वर्धा शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक व वाहतुकीच्या ठिकाणी जनावरे मोकाट सोडल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासोबतच वाहनचालक, पादचारी तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा शहर पोलिसांकडून मोकाट जनावरांबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने मोकाट जनावरे सार्वजनिक रस्त्यावर सोडणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केलेत. 

वर्धा शहर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर काही जनावरे कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीशिवाय व नियंत्रणाशिवाय मोकाट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. सदर जनावरे सार्वजनिक रस्त्यावर बसल्यामुळे तसेच रस्त्यावर फिरत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच अचानक रस्त्यावर येणार्‍या जनावरांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सदर जनावरे त्यांच्या मालकांनी अथवा ताब्यात असलेल्या व्यक्तींनी योग्य देखरेख व नियंत्रण न ठेवता सार्वजनिक रस्त्यावर मोकाट सोडल्याचे निदर्शनास आल्याने, तसेच जनावरांना आवश्यक अन्न, पाणी व निवारा उपलब्ध करून न देता त्यांना उपासमार, तहान, अनावश्यक वेदना व त्रास होईल अशा परिस्थितीत सोडून दिल्याचे आढळून आल्याने, संबंधित अशा पशु पालकांविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर आणि रामनगर पोलीस स्टेशन येथे कलम २८५, भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम ९०(ए), महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ११(१)(प्) व ११(१)(ग्), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० अन्वये गुन्हे नोंद केले आहेत.

आपल्या मालकीची किंवा ताब्यातील जनावरे सार्वजनिक रस्ते, चौक अथवा वाहतुकीच्या ठिकाणी मोकाट सोडू नयेत. जनावरे मोकाट सोडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास तसेच प्राण्यांना आवश्यक अन्न-पाणी व निवारा न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT