यंदा जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसाने शेतातील तण नियंत्रणाकरिता अनेक शेतकर्यांनी तण नाशकांची फवारणी केली आहे. दरम्यान, कारंजा तसेच आष्टी तालुक्यात काही शेतकर्यांनी फवारणी केलेल्या तणनाशकामुळे सोयाबीनच जळाल्याचा प्रकार पुढे आला. याबाबत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केलेली आहे.
यावर्षी संततधार पावसाने शेती मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. त्यात पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण झाले. अनेक शेतकर्यांनी तण नाशकाचा पर्याय स्वीकारत सोयाबीनमध्ये तण नाशकाची फवारणी केली. काहींच्या शेतातील तणाचा नायनाट झाला. पण, काही शेतकर्यांच्या मात्र शेतातील पिकांच मोठं नुकसान झालं आहे. काही शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक जळालेल्या अवस्थेत आहे. यामुळे मोठा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. अनेक शेतकर्यांनी मुख्य पीक म्हणून सोयाबीनची लागवड केली आहे. त्यात तण नाशकाच्या फवारणीनंतर सोयाबीन जळाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
आष्टी तालुक्यातील किन्हाळा, तसेच खडकी येथील शेतकर्यांच्या सोयाबीनचे यात नुकसान झाले आहे. दोन्ही गावांतील २६ शेतकर्यांचे ५१ हेक्टरवर नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. याबाबत कृषी विभागाने पाहणी करत नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कारंजा (घाडगे) तालुक्यातही सावल येथील काही शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केलेली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.