वर्धा : शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तिर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, युवाकार्य प्रशिक्षण योजना, बळीराजा योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना, सोयाबिन कापूस अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
शिक्षण, आरोग्य, कृषि विकास सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसुत्रीवर आपल्याला पुढील काळात भरीव कामगीरी करायची आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पालकमंत्री यांनी ध्वजारोहण केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 13 हजार 406 लाडक्या बहिनींना लाभ देण्यात आला असून सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहीणीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावांचे ड्रोन व्दारे सर्वेकरुन गावठाण, जुने नगर भूमापन गावे, उजाड गावे, पुनर्वसन गावे, नगरपालिका क्षेत्रातील गावे, गावठाण नसलेल्या 660 गावातील 93 हजार 814 मिळकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून 27 हजार 519 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
मागील वर्षी काही भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीत 60 हजार 555 शेतक-यांचे शेतपिकाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतक-यांना 74 कोटी 86 लाख 96 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यातील 50 हजार 753 शेतक-यांना 708 कोटी 41 लाखाचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 38 हजार 942 कुटूंबांपैकी 2 लाख 34 हजार 754 कुटूंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आली असून याची टक्केवारी 98 टक्के इतकी आहे.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस, गृहरक्षकदल, एनसीसी, स्काऊड गाईड व शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी उत्कृष्ट पथ संचलन केले. याप्रसंगी उत्कृष्ठ कामगिरी करणा-या शासकीय अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, सामाजिक कायकर्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नीचा मान्यरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर यांनी केले.