शक्तिपीठ महामार्ग (प्रातिनिधीक छायाचित्र ) File Photo
वर्धा

शक्तीपीठ महामार्गाची होणार सेवाग्राम येथून सुरुवात

shaktipeeth mahamarg| पालकमंत्री भोयर यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

पुढारी वृत्तसेवा

वर्धा - देशाच्या स्वातंत्र्य लढयाचे केंद्रस्थान असलेल्या सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाची सुरूवात सेवाग्राम येथून होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

सेवाग्राम गावाची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. सेवाग्राम महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहली आहे. सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत परिसराचा काळात विकास झाल्यानंतर भाजपा सरकारने सेवाग्रामला पुन्हा एक अनोखी भेट दिली आहे. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ८०२ किलोमीटरच्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टीविटी वाढणार असून या दोन्ही भागाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गमुळे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणूका माता, अंबेजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तीपीठे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. परळी वैजनाथ, औंढा नागनाथसह अन्य तीर्थस्थळे देखील मार्गाशी जोडली जाणार असल्याने हा महामार्ग पर्यटनासोबतच मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. मार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. समृद्धी महामार्गाशी जिल्ह्याला जोडल्या नंतर आता शक्तीपीठ महामार्ग देखील जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शक्तीपीठ महामार्ग आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे मार्गावरील प्रमुख धार्मिक क्षेत्र व तीर्थस्थळे जोडण्यात येणार आहे. तसेच विकासाला गती मिळण्यासोबतच प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला. सदर महामार्गाची प्रत्यक्ष सुरुवात जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याने जिल्ह्यातील तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार, असल्याचे पालकमंत्री भोयर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT