वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटना, वाहनचालकांकडून होणारा वाहतूक नियमांचा भंग, अतिवेगाने वाहन चालविण्याची प्रवृत्ती तसेच मध्यंतरी घडलेल्या वाटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या गंभीर बाबींची दखल घेत राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी समृद्धी महामार्गावर पोलिसांची प्रभावी यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून, समृद्धी महामार्गावर १५ महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या निर्णयानुसार १५ पोलीस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षासाठी विविध संवर्गातील एकूण ४२० नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर आता अधिक सक्षम पोलीस यंत्रणा कार्यरत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्गावर पोलिसांची नियमित गस्त, तातडीची मदत आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणेची आवश्यकता होती. ही गरज ओळखून गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
शासन निर्णयानुसार नव्याने निर्माण होणा-या ४२० पदांमध्ये १६ सहायक पोलीस निरीक्षक, ३३२ पोलीस उपनिरीक्षक, ४८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, २७६ पोलीस शिपाई आणि ४८ पोलीस शिपाई (वाहनचालक) यांचा समावेश आहे. या पदांच्या निर्मितीसोबतच त्यासाठी४३ कोटी ४७ लाख ३३ हजार ४२४ रुपयांच्या आवर्ती खर्चास आणि ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ९६६ रुपयांच्या अनावर्ती खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे.
समृद्धी महामार्गावरील वायफड, येळाकेळी (वर्धा), धामणगाव-आसेगाव, गावनेर-तळेगाव-शिवणी, कारंजा लाड, मालेगाव-जहांगीर, दुसरबीड, सिंदखेड राजा, निढोणा(जालना), सावंगी(छत्रपती संभाजीनगर), हडस-पिंपळगाव, कोकमठाण(शिर्डी), गोंदे-सिन्नर, पिंपरी सद्रोद्दीन(इगतपुरी) आणि शहापूर-खुटघर अशा १५ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे प्रस्तावित आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे महामार्ग पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.