वर्धा : पोलिसांनी घरफोडी करणार्यास एका चोरट्यास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशीदरम्यान घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले असून आठ लाख ७१ हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांत वर्धा जिल्ह्यातील ७ तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथे १२ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे घराचे लॉक तोडून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करून तसेच जिल्ह्यात घडलेल्या घरफोडी व चोरी दाखल गुन्हे संबंधाने वर्धा शहर परीसरात पेट्रोलींग दरम्यान तपासणी सुरू होती. त्यावेळी एक इसम बजाज चौक, रेल्वे उडान पुलाचे खाली संशयास्पद स्थितीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून घेराव टाकून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचे नाव प्रवीण विनायकराव आक्केवार (वय ५६), रा. चंद्रपूर असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याची अंगठी व सोन्याचा ऐवज, चांदीचा शिक्का, रोख ३८ हजार रुपये, मोबाईल, दोन लोखंडी घरफोडी करण्याकरीता वापरण्यात येणारी अवजारे, चावीचा गुच्छा, ईलेक्ट्रोनीक पॉकीट वनजकाटा असा ८,७१,३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याने वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर, पुलगाव, हिंगणघाट, सेवाग्राम, सावंगी (मेघे), तसेच अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस स्टेशन अशा परिसरात बंद घराचे लॉक तोडून ११ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती पुढे आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, अलका कुंभलवार यांनी केली.