वर्धा : नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे देशी दारूच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीणच्या एमआयडीसी बोरी पोलीस ठाण्यात या दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून आल्याची माहिती मिळताच, नागपूर पोलिसांनी ही गाडी वर्ध्याच्या दिशेने गेल्याचा अलर्ट वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार केली.
तपासात ही कार वर्ध्यातील रवींद्रसिंग उर्फ कालू जुनी याची असल्याचे निष्पन्न झाले. तो आपल्या साथीदारांसह शहरात फिरत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी महादेवपुरा परिसरात सापळा रचला आणि घेराव घालून चौघांनाही ताब्यात घेतले.
याप्रकरणी रवींद्रसिंग लखन सिंग जुनी (रा. कारला चौक, वर्धा), तुषार दामोदर सहारे (रा. बुटीबोरी, नागपूर), नयन दत्ताजी कडू (रा. पिपरी मेघे, वर्धा), मंथन महादेव मोहरले (रा. बुटीबोरी, नागपूर) अटक करण्यात आले आहे. यांच्याकडून दोन देशी कट्टे, चार मोबाईल आणि ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात इतरही गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी त्यांना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.